महाराष्ट्रातील हनुमान चालिसा पठणाचं लोण आता उत्तर प्रदेशातंही
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या हनुमान चालिसा पठणाचं लोण आता उत्तर प्रदेशातंही पोहोचलं आहे. उत्तर प्रदेशातल्या कासगंज आणि अलिगडमध्ये मंदिरांवर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण करण्यास सुरुवात करण्यात आली. मशिदीवर लाऊड स्पीकर लावून अजान म्हणण्यास राज ठाकरेंनी विरोध केला. मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी त्यांनी 3 मेचा अल्टिमेटमही दिला आहे. त्यानंतर आता अन्य राज्यांतही हा मुद्दा तापू लागला आहे. उत्तर प्रदेशातल्या कासगंजमध्ये हिंदुत्ववादी नेते नितीन चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखाली मशिदीसमोरच्या मंदिरांत लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. तर अलिगडमध्ये युवा क्रांती मंचच्या कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण केलं.
महाराष्ट्राच्या लाऊडस्पीकर वादाचा आवाज आता देशाच्या विविध भागात पोहोचत आहे. उत्तर प्रदेशातही हा वाद जोर धरताना दिसत आहे. यूपीच्या अलीगढमधील युवा क्रांती मार्चच्या डझनभर कार्यकर्त्यांनी गांधी पार्क परिसरात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचं पठण केलं. मशिदींतील लाऊडस्पीकर उतरवण्यासाठी आम्ही प्रशासनाला यापूर्वी निवेदन दिलं होतं, असे युवा क्रांती मंचचं म्हणणं आहे. मात्र सुनावणी झाली नाही. युवा क्रांती मंचचे महामंत्री शिवांग तिवारी यांनी म्हटलं की, प्रत्येक चौका चौकात लाउडस्पिकर लावण्याचं काम करण्यात येईल. त्यासाठी आम्ही सकाळी 5 आणि संध्याकाळी 5 वाजताची वेळ निश्चित केली आहे. या वेळी आम्ही हनुमान चालिसाचं पठण करणार.
अलिगडमध्ये लाऊडस्पीकरचा वाद पेटला
अलीगडमध्ये अभाविपने 21 चौकात लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाचण्याची परवानगी मागितली आहे. अभविपनंही प्रशासनाला अल्टिमेटम दिलं आहे. ABVP चे माजी नेते बलदेव चौधरी म्हणाले की, जर प्रशासनानं आम्हाला परवानगी दिली नाही आणि त्यासाठी कोणतंही ठोस कारण दिलं नाही तर आम्ही येत्या मंगळवारी म्हणजेच 19 तारखेला परवानगीशिवाय लाऊडस्पीकर लावू. अलिगडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाचण्याबाबत आणि प्रशासनाला अल्टिमेटम देण्याबाबत मंत्री धरमपाल सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते माध्यमांवरच संतापले.