मंत्रिमंडळ विस्तार घडामोडींना वेग,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक,कुणाला संधी मिळणार!
मुंबई ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोमवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. या बैठकीत दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोबत या बैठकीदरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणाचा मुद्दाही चर्चेला आला होता, असंही सांगितलं जातंय. तब्बल दीड तास एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात यावेळी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडली.
राज्यात दुसरा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणा कुणाचं नाव असणार यावरुनही अनेकदा तर्क वितर्क लढवले गेले होते. तर शिंदे गटातील काही जणांनी आपल्याला मंत्रिपद मिळावं, अशी इच्छाही उघडपणे बोलून दाखवली होती. मंत्रिपद न मिळालेल्या शिंदे गटातील काही जणांच्या नाराजीचा मुद्दाही चर्चेत आला होता. त्यातच बच्चू कडू यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या विधानांमुळेही सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यासोबत शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत जितेंद्र आव्हाड यांचाही मुद्दात चर्चिला गेल्याचं सूत्रांनी म्हटलंय. ठाण्यात गेल्या चार दिवसांपासून राजकारण तापलंय. आधी विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरण आणि त्यानंतर विनयभंगाचा आरोप यामुळे वाद उफाळून आलाय. जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आलाय. खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोपही शिंदे-फडणवीस यांच्यावर करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी विनयभंग प्रकरणी लक्ष घालावं, अशी मागणीही करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर गृहखातं ज्यांच्याकडे आहे, त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिंदे यांनी नेमकी काय चर्चा केली, यावरुन आता चर्चांना उधाण आलं आहे