देशातली टोल सिस्टीम संपुष्टात येणार,म्हणजे काय? पैसे भरावे लागणार नाही का? काय आहे सरकारचा प्लॅन
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देशातली टोल सिस्टीम संपुष्टात आणणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. सध्या हायवे वापरण्यासाठी टोल भरावा लागतो. टोल प्लाझा दर १००-१५० किलोमीटर अंतरावर आहेत. टोल भरल्यानंतरच पुढे जाता येतं. काही ठिकाणी टोल भरताना खूप वेळ वाया जातो. अशा स्थितीत हायवेचा नेहमी वापर करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. टोल सिस्टीम संपल्यावर हायवे वापरण्यासाठी पैसे भरावे लागणार नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवीन टोल कलेक्शन सिस्टीम आधुनिक असेल
२७ मार्च रोजी नितीन गडकरींनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं, की सरकार देशातली सध्या अस्तित्वात असलेली टोल सिस्टीम बंद करणार आहे. त्याऐवजी आधुनिक टोल कलेक्शन सिस्टीमचा वापर केला जाईल. म्हणजेच रस्त्यावरून प्रवास करताना पैसे भरावे लागतीलच; फक्त पद्धत बदलणार आहे.
टोल प्लाझावर थांबावं लागणार नाही. आताच्या टोल प्लाझाच्या जागी सरकार सॅटेलाइट आधारित टोल कलेक्शन सिस्टीम सुरू करणार आहे. गडकरींनी या सिस्टीमबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. तुम्ही हायवेवरून प्रवास केल्यास तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील, असं ते म्हणाले. तसंच लोक जेवढे किलोमीटर प्रवास करतील, तेवढ्याचेच पैसे त्यांना मोजावे लागतील. चांगले महामार्ग बांधल्यानंतर लोकांचा वेळ आणि इंधनाची बचत होत आहे. त्यांनी मुंबई आणि पुण्याचं उदाहरण दिले. पूर्वी मुंबईहून पुण्याला जायला नऊ तास लागायचे, आता फक्त दोन तास लागतात, असं जास्त टोल टॅक्सच्या तक्रारीवर उत्तर देताना ते म्हणाले.
गाडी मालकाच्या खात्यातून कापले जातील पैसे
नॅशनल हायवेज ऑथोरिटी ऑफ इंडियाने (NHAI) मार्च २०२४ पर्यंत देशात टोल कलेक्शनची नवीन सिस्टीम सुरू करण्याचा प्लॅन बनवला आहे, असं गडकरी डिसेंबरमध्ये म्हणाले होते. नवीन सिस्टीम जीपीएस टेक्नॉलॉजीवर आधारित असेल. म्हणजेच ड्रायव्हरला टोल भरण्यासाठी टोल प्लाझावर थांबावं लागणार नाही, कार मालकाच्या बँक खात्यातून टोलचे पैसे आपोआप कापले जातील.
व्हेइकल मॉनिटरिंगसाठी होईल सॅटेलाइटचा वापर
नवीन सिस्टीमसाठी सर्व गाड्यांवर नवीन नंबर प्लेट लावाव्या लागतील. गाडीचं मॉनिटरिंग सॅटेलाइटच्या माध्यमातून जीपीएसने होईल. हायवेवर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर लावले जातील. जीपीएस या नंबर प्लेट वाचतील. मग टोलचे पैसे गाडीच्या मालकाच्या बँक खात्यातून कट होतील. सध्या टोल प्लाझावर पेमेंटसाठी फास्टॅगचा वापर होतोय.