भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

सुटका नाहीच! पुढचे ५ दिवस तापमानाचा पारा आणखीनच वाढणार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चांगलीच वाढ होत आहे. दिवसेंदिवस तापमान अधिकच वाढत असल्यानं नागरिकांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच आता काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुढील पाच दिवस तापमानाचा पारा आणखीच वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

येत्या पाच दिवसांमध्ये २ ते ३ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, उष्माघाताने आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अशात नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावं, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गुरुवारी पुण्यातही तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील बहुतेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे होतं. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्येही सूर्य आग ओकतोय. आगामी काही दिवसांमध्ये तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

राज्यातील नागरिक उकाड्याने हैराण झालेले असतानाच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. जागतिक हवामान संघटनेच्या एका अहवालानुसार, उष्णता शोषून घेणारे हरितगृह वायू आणि एल निनोमुळे येत्या पाच वर्षांमध्ये जागतिक तापमानात विक्रमी वाढ होईल. यात म्हटलं आहे, की २०२३ ते २०२७ दरम्यान एक वर्ष असं असेल जे जागतिक तापमान वाढीचे सर्व विक्रम मोडेल.

यंदाच्या वर्षी मान्सूनचा प्रवासच उशिरानं सुरु होणार असल्यामुळं परिणामी त्याचं महाराष्ट्रात होणारं आगमनही लांबणीवर पडल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) देण्यात आली. स्कायमेट या खासगी संस्थेनंही असंच काहीसं निरीक्षण नोंदवलं, ज्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्याही चिंतेत भर पडली, मागील साधारण दोन महिन्यांपासून राज्यात अवकाळीनं धुमाकूळ घातला. या अवकाळीच्या फेऱ्यानं काढता पाय घेतला नाही तोच एकाएकी राज्यातील तापमानात वाढ होत असल्याची बाब नोंदवली गेली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!