15 जुलै नंतर पुढील चार महिने लग्नाचा एकही मुहूर्त नाही,बघा पुढील शुभ मुहूर्त कधी
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। हिंदु धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिला जातो, जेणेकरुन ते कार्य चांगल्या प्रकारे पूर्ण होईल आणि त्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. शुभ मुहूर्त म्हणजे ग्रह आणि नक्षत्रांची अनुकूल स्थिती. विवाहामध्ये शुभ मुहूर्ताची विशेष काळजी घेतली जाते कारण लग्न हे संपूर्ण आयुष्याचे नाते असते. मान्यता आहे की एखाद्या शुभ मुहूर्तावर लग्न केल्याने विवाह सुरळीत पार पडतो तसेच वैवाहिक जीवन सुखी राहते.
आपणही लग्न करण्याचा विचार करत असाल तर उशिर करू नका. आज (म्हणजेच 7 जुलै 2021) यानंतर आणखी दोन मुहूर्त शिल्लक आहेत. हे दोन मुहूर्त 13 आणि 15 जुलै रोजी आहेत.15 जुलै नंतर, पुढील चार महिने कुठलाही शुभ मुहूर्त नाहीत.कारण 20 जुलै रोजी देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होईल आणि केवळ लग्नच नाही तर कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यावर बंदी असते. चातुर्मास म्हणजे काय?
असे मानले जाते की देवशायनी एकादशीच्या दिवसापासून जगाचे तारणहार भगवान विष्णू क्षीरसागर येथे योग निद्रेत जातात. देवउठनी एकादशीच्या दिवशी चार महिन्यांनंतर त्यांचे डोळे उघडतात. या चार महिन्यांत भगवान शिव यांच्याकडे संसार चालविण्याची जबाबदारी सोपविण्यात येते. सर्व मांगलिक कार्य यासाठी थांबविली जातात कारण, लोकांचा असा विश्वास आहे की भगवान अद्याप निद्रेत आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांचे आशीर्वाद कोणत्याही कामात मिळणार नाहीत. देवउठनी एकादशीच्या दिवशी जेव्हा परमेश्वर जागे होतात, त्या दिवसापासून पुन्हा शुभ कार्याला सुरुवात होईल.
2021 मध्ये खूपच मर्यादित विवाह मुहूर्त आहेत. वर्षभरात एकूण 51 शुभ मुहूर्त आहेत. त्यामध्ये कोरोनाने अडथळा निर्माण केला आणि अनेकांचे लग्न लांबणीवर पडले. 19 जानेवारीपासून गुरु तारा अस्त झाला होता आणि 16 फेब्रुवारीपर्यंत अस्त होता. त्याच 16 फेब्रुवारीपासून शुक्र तारा अस्त जाला होता आणि 18 एप्रिलला उदय झाला. शुक्राच्या उदयानंतर 22 एप्रिलपासून पुन्हा एकदा विवाहसोहळे सुरु झाले आणि आता 15 जुलैपर्यंत शुभ मुहूर्त आहेा. 15 जुलैनंतर 2021 वर्षाचा पुढील शुभ मुहूर्त 15 नोव्हेंबरला असेल.
15 जुलैनंतर येणारे शुभ मुहूर्त
15 जुलैनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात एकूण 13 मुहूर्त असतील. नोव्हेंबर महिन्यात 7 मुहूर्त पडतील आणि 6 मुहूर्त डिसेंबरमध्ये असतील. नोव्हेंबर महिन्यात 5, 16, 20, 21, 28, 29, 30 या तारखांना विवाहाचे शुभ मुहूर्त असतील आणि डिसेंबर महिन्यात 1, 2, 6, 7, 11, 13 या तारखांना लग्नासाठी शुभ मुहूर्त असेल. त्यानंतर थेट पुढच्या वर्षी 2022 मध्ये लग्नाचे मुहूर्त असतील.