आजपासून बदलले ‘हे’ नियम ; त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम, काय महाग,काय स्वस्त?
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आधीच महागाईत जनता होरपळत असताना आजपासून नव्या नियमांमुळे त्यात भर पडणार आहे. महागाईत पुन्हा लोकांच्या खिशाला फटका बसणार आहे. आज १ जुलै २०२३ पासून सरकारने अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांचा थेट खिशावर कुठे परिणाम होऊ शकतो, ते जाणून घ्या.
देशातील सामान्य माणसाला पुन्हा महागाईचा फटका बसणार आहे, कारण १ जुलै २०२३ पासून नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. १ जुलैपासून बँक, कर प्रणाली तसेच कायद्याशी संबंधित काही बाबींमध्ये नवीन नियम लागू होणार आहेत.
चपला महागणार
आता देशात निकृष्ट दर्जाचे बूट आणि चप्पल विकली जाणार नाहीत. १ जुलै २०२३ पासून देशात निकृष्ट दर्जाच्या पादत्राणांच्या निर्मिती आणि विक्रीवरही बंदी घालण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे पालन करुन, भारत सरकारने पादत्राणे युनिट्सना गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCO) लागू करण्याचे आदेश दिले आहेत, ज्या अंतर्गत २७ फुटवेअर उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स स्वस्त होणार
१ जुलै २०२३ पासून मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप यांसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत कपात केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि त्यांच्या घटकांचे दर खूप कमी झाले आहेत. सेमीकंडक्टर आणि कॅमेरा मॉडेल्ससह स्मार्टफोनच्या सर्व घटकांच्या किमतीत घट झाल्यामुळे मोबाईल, टीव्ही, फ्रीजच्या किमतीत घट होणार आहे.
वाहतूक नियमांमध्ये बदल
आता संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत नवीन वाहतूक नियम लागू होणार आहेत. १ जुलैपासून चारचाकी वाहनांमध्ये मागील सीटवर बसलेल्या व्यक्तींना सीट बेल्ट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम संपूर्ण देशात लागू असला तरी आता हा नियम न पाळल्यास तुमचा खिसा खूप मोकळा होऊ शकतो.
एलपीजीच्या किमती
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजीच्या किमती बदलतात. गेल्या महिन्यातही एलपीजी गॅस सिलिंडर विकणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजीचे दर बदलले होते. आता पुन्हा एकदा त्याच्या किमती बदलल्या जाऊ शकतात.
पॅन-आधार अपडेट
ज्या लोकांनी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, आजपासून १ जुलै २०२३ पासून त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. या परिस्थितीत तुम्ही आयटीआर दाखल करु शकणार नाही किंवा तुमची प्रलंबित रिटर्न प्रक्रिया पुढे जाईल. त्याच वेळी, तुमचे प्रलंबित परतावे देखील जारी केले जाणार नाहीत आणि तुमची कर कपात देखील उच्च दराने होईल.
HDFC विलीनीकरण
आज, १ जुलै, २०२३ पासून, देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC बँकेत गृहनिर्माण विकास वित्त निगम म्हणजेच HDFC Ltd चे विलीनीकरण होणार आहे. या विलीनीकरणानंतर एचडीएफसी लिमिटेडच्या सेवा बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध होतील. आता एचडीएफसी बँकेच्या शाखेत कर्ज, बँकिंगसह इतर सर्व सेवा पुरवल्या जातील.