शिंदे गटातील ‘या’ दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात लागणार लॉटरी
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राजकीय वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. येत्या जानेवारीअखेर केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच खातेपालटही होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटातील १३ पैकी २ खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या दोन खासदारांना कॅबिनेट आणि राज्यमंत्री बनवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
हे दोन खासदार कोण
मोदी सरकारमध्ये मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे आणि बुलडाणाचे खासदार प्रतापराव जाधव या दोघांना मंत्रिपद मिळू शकतं. प्रतापराव जाधव हे तीन वेळा बुलडाण्यातून लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागू शकते. तर राहुल शेवाळे यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांनी बंड पुकारलं. त्यामुळे शिवसेनेत फुट पडली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार
हेमंत गोडसे, राजेंद्र गावित, धैर्यशील माने, संजय मंडलिक, सदाशीव लोखंडे, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, हेमंत पाटील आणि गजानन कीर्तीकर.हे १३ खासदारही शिंदे गटात सामील झाले.