यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुटी नाही; एप्रिल मध्येही पूर्ण वेळ शाळा व परीक्षा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून येत्या मार्च आणि एप्रिल महिनाभर संपूर्ण उपस्थिती सह शाळा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यामुळे यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांना मुकावं लागणार आहे.
शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
थोडक्यात मार्चमध्ये परीक्षा संपून एप्रिलच्या पहिल्या आठवडयात विद्यार्थ्यांना उन्हळ्याच्या सुट्या मिळत होत्या. मात्र यंदा संपूर्ण मार्च आणि एप्रिल महिनाभर विद्यार्थ्यांची पूर्ण वेळ शाळा असणार आहे. इतकंच नाहीतर रविवारीही ऐच्छिक असल्यास शाळा सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही असंच दिसतंय.
संपूर्ण महिना अभ्यासात जाणार
त्यात शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यातील तीसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भर उन्हात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. संपूर्ण एप्रिल महिना हा शाळा अभ्यास आणि परीक्षांमध्ये जाणार आहे.
उन्हाळा म्हंटल की विद्यार्थ्यांना वेध लागतात ते सुटीचे. मात्र कोरोनामुळे आणि शाळांचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण व्हावा म्हणून विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यातही शाळॆत यावं लागणार आहे. शाळांनाही उन्हाळ्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांसाठी काही विशेष सोयी कराव्या लागण्याची शक्यता आहे. एकूणच काय तर यंदा सुटीचा महिना हा अभ्यासात जाणार असल्याची चिन्हं आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा