विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या तीन महत्त्वाच्या घोषणा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे उद्यापासून सुरु होणार असून शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन असल्याने नव्या सरकारची कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
तीन महत्त्वाच्या घोषणा
शुक्रवारी दहीहंडीचा सण आहे, यंदाच्या दहीहंडीत गोविंदांना १० लाखांचे विमा कवच असणार त्याचबरोबर ग्रामीण भागासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. ७५ वर्षांवरच्या व्यक्तींना एसटी प्रवास मोफत करण्यात येणार आहे. तिसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे
लता मंगेशकर संगीत अकादमीचं काम पूर्ण होत आलंय, ही संगीत अकादमी २८ सप्टेंबरला सुरू होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. हे संगीत महाविद्यालय लता दीदींच्या जयंती दिनी २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. आधीच्या निर्णयांना स्थगिती आणि ओल्या दुष्काळावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तर महाविकास आघाडी सरकारपेक्षा वेगानं निर्णय घेत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.
तसंच विरोधकांनी बहिष्काराची कारणं सांगणारं मुख्यमंत्र्यांना सात पानी पत्रही दिलं. हे पत्र म्हणजे अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आहे की काय असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावलाय. तसंच आपल्या सरकारनं साडे सातशे निर्णय़ घेतल्याचं अजित पवारांनीच पत्रात म्हटल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.
ठाकरे गट-शिंदे गट पुन्हा आमने सामने
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हीप जारी करण्यात आलाय. उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंनी हा व्हीप जारी केलाय. अधिवेशन काळात दररोज कामकाज संपेपर्यंत सभागृहात हजर राहण्याबाबतचा हा व्हीप आहे. शिवसेनेचे खरे व्हीप कोण? हा वाद सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.
विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना मान्यता दिलीय. असं असताना ठाकरे गटाच्या प्रतोदांनी जारी केलेला हा व्हीप शिंदे गटाच्या आमदारांना बंधनकारक असणार का, याची चर्चा रंगलीय.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा