भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे
राज्यपालांचे आदेश

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता शिवसेनेच्या शिंदे गटाचं आणि भाजपचं सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नव्या सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. नव्या सरकारने बहुमत सिद्ध करा, असे आदेश दिले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी येत्या शनिवारी म्हणजेच 2 जुलैला विशेष अधिवशेन भरवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या शनिवारी विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विधासभा अध्यक्षांचीदेखील निवड होणार असल्याची माहिती सूत्रांना दिली.

दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला भाजपचे काही नेते, पत्रकार उपस्थित होते.

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वरसाक्षी शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालं आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा राखीन. मी भारताची सार्वभौमत्व आणि एकात्मता राखीन. मी महाराष्ट्राच्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडेन. संविधान आणि कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे, तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्यायाची वागणूक देईन”, अशी शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!