महाराष्ट्रराजकीय

राज्याच्या राजकारणात भूकंप, काँग्रेसचे दोन आमदार करणार या पक्षात प्रवेश!

मुंबई,मंडे टू मो डे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे दोन आमदार पक्ष सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे हे आमदार भाजप-शिवसेनेमध्ये नाही तर चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात जाणार आहेत. याशिवाय एक अपक्ष आमदार आणि आपचे नेतेही चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ही माहिती दिली आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये होणाऱ्या सभेत आपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. चंद्रशेखर राव यांनी काहीच महिन्यांपूर्वी तेलंगणा राष्ट्रसमिती अर्थात टीआरएसचं नाव बदलून बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती केलं. राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका निभावण्यासाठी चंद्रशेखर राव तयारी करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये सभा घेत महाराष्ट्रात एण्ट्री घेतली होती.

आता बीआरएसमध्ये प्रवेश करणारे काँग्रेसचे ते दोन आमदार कोण? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी १३ आमदार गैरहजर राहिले होते, तेव्हापासून काँग्रेसच्या या आमदारांबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याशिवाय मागच्या वर्षी जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्येही काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं, ज्यामुळे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. या क्रॉस व्होटिंगनंतर काँग्रेस हायकमांडने समिती नेमून चौकशी केली होती, पण यानंतरही क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांवर कोणतीही कारवाई झाली नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!