राज्यातील टोल नाक्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। राज्यातील टोल नाक्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या सहा महिन्यात टोल नाके बंद करण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी राज्यसभेत म्हटले. देशातील टोलनाक्यांसाठी सरकार नवीन तंत्रज्ञानाचा विचार करत आहे. येत्या सहा महिन्यांत ही नवीन प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी म्हटले.
“टोल नाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. परिणामी अनेक समस्यांना वाहन चालकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहन चालकांना होणाऱ्या या समस्या सरकारला दूर करायच्या आहेत”, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.
याशिवाय, “सरकार टोलसाठी तीन प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाचा विचार करत आहे. जेवढा प्रवास तेवढाच टोल आकारणार आहोत. पहिला प्रकार हा वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणांबाबत आहे. तर दुसरा पर्याय हा आधुनिक नंबर प्लेट संबंधित आहेत. आम्ही काही महिन्यांपासून नंबर प्लेटच्या पर्यायावर भर देतोय. तर येत्या महिन्याभरात आणखी एखादा पर्याय समोर येण्याची अपेक्षा आहे”, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.
“या नव्या तंत्रज्ञानामुळे टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होणार नाही. वाहतुकीवरही कोणताही परिणाम होणार नाही. एखाद्या वाहनचालकाला टोल रोडवर १० किलोमीटर प्रवास केल्यानंतरही ७५ किलोमीटरचे पैसे टोल म्हणून द्यावे लागतात. मात्र, नव्या प्रणालीनुसार आता जितका प्रवास तेवढाच टोल द्यावा लागणार आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली”, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.
“भारतात २०२४ आधी २६ ग्रीन एक्स्प्रेसवे सुरू होतील. ज्यामुळे भारत रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेच्या बरोबरीने असेल. रस्त्यांच्या निर्मितीमुळे २ शहरांमधील अंतर आणखी कमी होईल”, असंही गडकरींनी नमूद केलं.
दरम्यान, टोल नाक्यांवर FASTag लागू झाल्यानंतर टोलच्या उत्पन्नात एका दिवसात १२० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५.५६ कोटी FASTag जारी केले गेले आहेत आणि त्याची पोहोच ९६.६ टक्के असल्याचेही नितीन गडकरी यांनी म्हटले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा