पुढील दोन-तीन दिवसांत राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, कुठे पडणार पाऊस?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ऐन थंडीच्या दिवसात राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत आहे. तर थंडीची लाट सुरू होत असताना हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
पुढील तीन दिवस म्हणजेच ७२ तासात मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. याशिवाय कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात चक्राकार वारे वाहत असल्याने राज्यात पावसासाठी पोषण वातावरण निर्माण झाल्याचंही हवामान खात्याने सांगितलं आहे. देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा ९ अंश सेल्सिअसच्या खाली आलं आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे.