अवकाळी पाऊस ; राज्यात आणखी पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच आता पुढील पाच दिवसात गारपीटाचा इशारा दिला आहे. पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस म्हणजे सोमवार दि.२० मार्चपर्यंत कोकण वगळता महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी वीजा आणि वारा यासहित किरकोळ पावसाच्या शक्यता आहे. त्या बरोबरच मध्य महाराष्ट्र(नंदुरबार ते सोलापूर), मराठवाड्यात ( छत्रपती संभाजीनगर ते नांदेड पर्यंत ) आज गारपीटीची शक्यता जाणवते, तर विदर्भात मात्र आजच्या बरोबर उद्याही गारपीट होवू शकते असे सांगण्यात येत आहे.
पुढील 2 ते 3 दिवस राज्यात गडगडाटासह पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर, नंदूरबार, विदर्भ, मराठवाडा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आदी भागांत पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, असा सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरवत राज्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अचानक अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. मुंबईतही गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.