भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

भिंतीवरील घड्याळात छुपा कॅमेरा बसवून भेट दिले,स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड : प्रवीण चव्हाणांचा आरोप

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सोबतच फडणवीसांनी सादर केलेल्या व्हिडीओंमागे देखील जळगाव कनेक्शन असल्याचं म्हटलं आहे. गिरीश महाजनांवर ज्या प्रकरणात गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेले व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत समोर आणले. प्रवीण चव्हाण हे गिरीश महाजन यांना बनावट गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस विधिमंडळात यांनी केला. यावर आता विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी त्यांची मांडली आहे.

स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड
चव्हाण यांनी म्हटलं आहे की, फडणवीसांनी पुढे आणलेल्या व्हिडीओमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे, असं प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला आणि त्याने हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. यातून या स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड होतं आहे, असंही प्रवीण चव्हाण म्हणालेत.

भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला
प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं की, या प्रकरणात पुरावे आहेत म्हणून कारवाई होतेय. माझे रेकॉर्डिंग मॅनिप्युलेट करुन वापरण्यात आलं आहे. व्हिडीओ आणि ऑडिओ वेगळे आहेत. वाक्ये अर्धवट वापरण्यात आली आहेत. माझ्या ऑफिसात अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यासाठी त्याने समोरच्या काचेच्या भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला.

या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी
चव्हाण यांनी म्हटलं की, तेजस मोरे हा तुरुंगात होता आणि जामिन मिळवण्यासाठी माझ्याकडे येत होता. तेजस मोरे हा मूळचा जळगावचा आहे आणि जळगावमधूनच हे सर्व करण्यात आलंय. तेजस मोरेला अनेकांची साथ आहे. मी चालवत असलेल्या केसेसमधे जे आरोपी तुरुंगात आहेत त्यांचीही त्याला साथ आहे. मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असं देखील प्रवीण चव्हाण यांनी बोलताना म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!