उत्तर महाराष्ट्रासह राज्यात पुन्हा वादळीवारे व गडगडाटासह पावसाचा इशारा, आणखी ५ दिवस वाढला पावसाचा मुक्काम
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसामुळे चांगलाच फटका बसला आहे. पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात आला आहे. एकीकडे कडाक्याचं ऊन तर त्यात अवकाळी पावसाची बॅटिंग सुरु आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी ५ दिवसांनी वाढला आहे. २ मे पर्यंत राज्यातील सर्वच भागांत अवकाळी पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात जोर जास्त राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा मे महिन्याची सुरुवात पावसाने होत आहे. आठवडाभर अवकाळीचे वातावरण राहणार असून, आगामी पाच दिवस राज्यात गडगडाटासह अवकाळीचा जोर राहणार आहे.
प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव सह धुळे, नंदुरबार, अहमदनगर, बीड, परभणी, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांना पुढील ३ ते ४ तासात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या सह संपूर्ण विदर्भात पावासाचा जोर जास्त राहणार आहे. मुंबईसह कोकणात मात्र हलका ते मध्यम पावासाचा अंदाज आहे. आगामी चार दिवस विदर्भात पावसाचा वेग जास्त राहणार आहे. यात यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागांत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील बहुतांश भागात पाऊस होत आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घेतला आहे. काही ठिकाणी तर गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, राज्यावरील अवकाळी ढग अजुन काही दिवस कायम राहणार आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढच्या काही तासात मेघगर्जनेसह वादळी पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
तर आज दि.२९ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भात वादळी वारे, जोरदार पाऊस, गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.