शरद पवार यांच्या “त्या” खळबळजनक विधानाने आघाडीचं काय होणार?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।येत्या निवडणुकांमध्ये भाजपला प्रखर विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यभरात वज्रमूठ सभांचे आयोजन केले आहे. तिन्ही पक्षांचे नेते या सभांना संबोधित करत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तसेच येत्या १ मे रोजी मुंबईतही वज्रमूठ सभा होत असून या सभेला पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हजेरी लावणार आहेत. मात्र, त्याआधीच शरद पवार यांनी एक बॉम्ब टाकल्याने खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठच सैल होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटाला टेन्शन येण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनी धक्कादायक विधान केलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र मिळून २०२४ ची निवडणूक लढणार आहे काय? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर सर्वांच्याच भुवया उंचावणारं होतं. आम्ही एकत्र लढणार. आज आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छाच पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यातील काही इश्यू महत्त्वाचे असतात. त्यावर अजून चर्चा झाली नाही. त्यामुळे २०२४ मध्ये आघाडी एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगू? असं शरद पवार म्हणाले. पवार यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरही पवार यांनी भाष्य केलं. त्यांच्या स्टॅटेजीनुसार ते फोडाफोडीचं काम करत असतील. आम्हाला भक्कमपणाने भूमिका घ्यावी लागेल. त्यावर आज सांगणं योग्य नाही. कारण आम्ही या संदर्भात कुणाशी चर्चा केली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं