निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकालेंवर कारवाई कधी – एकनाथ खडसे यांचा तारांकित प्रश्न
मुंबई,मंडे टु मंडे न्यूज वृत्तसेवा। मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करून समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल जळगाव येथील स्थानिक गुन्हा शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्यावरील कारवाईबाबत एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. एकनाथराव खडसे यांनी जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करून मराठा समाजाचा अवमान केला असून त्यांच्याविरुद्ध दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा पेठ जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरी बकाले यांच्यावर काय कारवाई करण्यात आली?, व त्यांच्यावर कारवाई करण्यात विलंब का होत आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, किरण बकाले तत्कालीन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी प्राप्त तक्रारी वरून विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी आदेश दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी अन्वये किरण बकालेना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित केले आहे. सदर प्रकरणी दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी तक्रारदार विनोद पंजाबराव देशमुख जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक किरण बकाले यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सद्य:स्थितीत तो तपासाधीन आहे. या प्रकरणी करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीच्या अहवालानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या दिनांक १३-ऑक्टोंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये किरण बकाले तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केली असून सदर विभागीय चौकशी अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचेकडे आजमितीस सुरु आहे. त्यावर एकनाथराव खडसे यांनी किरण बकाले यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.