खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हं आपलंच,’या’ गटान केला निवडणूक आयोगाकडे दावा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण चिन्हावर दावा केल्यानंतर आज शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे बाजू मांडली. यावेळी शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हं आपलंच असल्याचं म्हटलं आहे. तसेच शिंदे गट या चिन्हावर दावाच करू शकत नाही, असा दवाही केला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने स्वेच्छेने पक्ष सोडला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या चिन्हावर दावा करता येणार नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना पक्ष चिन्हाबाबतचं त्यांचं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं. उद्या दुपारी २ वाजेपर्यंत शिवसेनेला उत्तर देण्याची मुदत देण्यात आली होती. पण त्यापूर्वीच शिवसेनेने उत्तर देत शिंदे गटाचा दावा फेटाळून लावला आहे.
शिंदे गटाच्यावतीने धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगण्यात आला होता. त्याबाबतचं प्रतिज्ञापत्रं शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिल होतं. त्यामुळे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितलं. यापूर्वी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा करणारी उद्धव ठाकरे यांची याचिका फेटाळून लावली होती. खरी शिवसेना कोणती आहे याचा निर्णय निवडणूक आयोगानेच घ्यावा, असे आदेश कोर्टाने दिले होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे गट झाले आहेत. या दोन्ही गटांनी आपणच खरी शिवसेना असून आम्हालाच निवडणूक चिन्हं द्यावं अशी मागणी केली आहे. त्याला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला आहे
आज शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी उद्धव ठाकरे यांचं म्हणणं निवडणूक आयोगाकडे सादर केलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीने निवडून दिलं आहे. तसेच शिवसेनेची स्वत:ची घटना आहे. ही घटना निवडणूक आयोगाला दिली जाते. आम्ही दरवर्षी ही घटना आयोगाला देत असतो. त्यामुळे अध्यक्ष हा घटनेनुसारच ठरवला जात असल्याने शिंदे गट चिन्हावर दावा करू शकत नाहीत, असं देसाई यांनी म्हटलं आहे.