अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढणार? मुक्काम वाढला,कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाविकास आघाडीतील माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाने महत्वाचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. 100 कोटींच्या वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. सध्या अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी अनिल देशमुख यांनी सेशन कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र हा जामीनअर्ज पीएमएलए कोर्टानं फेटाळून लावला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे ?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.
अनिल देशमुखांचा जबाब आर्थर रोड जेलमध्ये
नुकताच सीबीआयने अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमध्ये जाऊन जबाब नोंदवला होता. तसेच या प्रकरणातील संबंधित आरोपींचा देखील सीबीआयने जवाब नोंदवलेला. आपल्या जवाबात यांनी काय माहिती दिली याबाबत त्यांनी जास्त काही बोलण्यास अॅड. जयश्री पाटील यांनी नकार दिला होता. मात्र भ्रष्टाचार प्रकरणात आम्ही लढा देत आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं. डॉ. पाटील यांनी 21 मार्च 2021 रोजी मलबार हिल पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी तक्रार दाखल केली होती.