जळगाव जिल्ह्यातील “या” दावेदार आमदाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “मंत्री” बनवणार?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाल्या नंतर दुसरा मंत्री मंडळ विस्तार कधी होणार याची तारीख जाहीर झाली नसतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. कुणा कुणाला मंत्री बनवायचं? हा विषय सोडवताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या नाकी नऊ येणार आहेत. कारण येणार शिंदे गटाच्या आणखी एका आमदाराने मी पण मंत्रीपदाचा दावेदार असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटातील अनके आमदार मंत्री पदाच्या प्रतीक्षेत असून आमदारांमध्ये मोठी धुसफूस सुरू असल्याचं दिसत आहे.
पारोळा मतदार संघातील चिमणराव पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ते शिंदे गटात सामील झाले. मागील तीन टर्मपासून चिमणराव पाटील हे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून येत आहेत. महाविकास आघाडीचे सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशा पडली. आमदार चिमणराव पाटील यांनी मंत्री पदासाठी सुरुवातीपासून दावेदार असल्याचा दावा केला आहे. मी तशी विनंती पण केली असल्याचे पाटील म्हणाले. मंत्रीपद न मिळाल्यामुळे चिमणराव पाटील नाराज होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यावेळी सर्वप्रथम आमदार चिमणराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या पाठशी उभे राहिले. चिमणराव पाटील हे बंडखोरांमध्ये ते सर्वात ज्येष्ठ आमदार होते. यामुळे पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात चिमणराव पाटील यांना एकनाथ शिंदे त्यांना मंत्रिपदाची संधी देतील, अशी अपेक्षा होती.
मुंबई- सुरत ते गुवाहाटी आणि गुवाहाटी ते गोवा यानंतर पुन्हा रिटर्न मुंबई. या दरम्यान चिमणराव पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिंदे गटाच्या बंडखोरीचे समर्थन करणारी भूमिका मांडली. प्रत्यक्षात मात्र राज्याच्या शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळालेली नाहीय. त्यामुळे चिमणराव पाटील यांचे समर्थक नाराज झाले.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत सुरु असलेल्या राजकीय वादामुळे आता चिमणराव पाटील हे चर्चेत आले आहेत ते शिवसेनेत असल्यापासून गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटलांमध्ये मतभेद आहेत. गुलाबराव पाटलांकडून होणाऱ्या कुरघोडीला कंटाळून चिमणराव पाटील ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेले, पण आता शिंदे गटात एकत्र असूनही त्यांच्यातला वाद मिटलेला नाहीये. गुलाबरावांनी राष्ट्रवादीच्या नेत्याला बळ देऊन आपल्याच सहकारी आमदाराला कमी लेखण्याचा प्रयत्न केल्यामुळं हा वाद अजून वाढण्याची चिन्हे आहेत.