लोकसभेची रावेरमधून निवडणूक लढवणार ; आ.एकनाथ खडसे यांची मोठी घोषणा
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सर्वाधिक जागा निवडून याव्यात यासाठी राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून उमेदवारांची चाचपणी केली आहे. माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रावेर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकतो.
राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नुकतेच जळगाव दौऱ्यावर आले होते.यावेळी बोलताना खडसे यांनी रावेर लोकसभेचा धनुष्यबाण उचलावा, अशी इच्छा जयंत पाटील यांनी बोलून दाखवली होती. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी देखील जयंत पाटील यांच्या इच्छेवर अनुकूलता दर्शवली आहे. मी लोकसभा लढवण्यास फार उत्सूक नाही. परंतु, पक्षाने जबाबदारी सोपवल्यास ती जबाबदारी मी निभावेन, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं .
रावेर लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत काँग्रेस आणि भाजप असा सामना रंगला आहे. १९८९ साली हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला तेव्हापासून आतापर्यंत पोटनिवडणुकांसह रावेरमध्ये एकूण १० निवडणुका झाल्या. या १० पैकी नऊ निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. फक्त एकच निवडणूक काँग्रेसला जिंकता आली. काँग्रेसने केवळ १३ महिन्यांसाठी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला होता. त्यामुळे काँग्रेसने या ठिकाणी आता बदल करावा आणि आम्हाला ही जागा द्यावी अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. अजून याबाबत निर्णय व्हायचा आहे. निर्णय झाला तर तो काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल.