चिंताजनक ; राज्यात कोरोना पुन्हा वाढतोय, सरकार अलर्ट मोडवर
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये मोठ्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. गेल्या २४ तासात कोरोना बाधितांची संख्या दीड हजाराने वाढली आहे. १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १ रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे पुन्हा राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका अलर्ट मोडवर आहे.राज्य सरकारने या बाबत गंभीर दखल घेत कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून कोविड सेंटर सुद्धा पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.
गेल्या २४ तासात राज्यात १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्यासुद्धा जास्त राहिली आहे. २४ तासात ६१४ कोरोना रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात ९८.०४ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ७७ लाख ३८ हजार ५६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.गेल्या २४ तसात मुंबईमध्ये ९६१, ठाण्यात २८ आणि ठाणे मनपा क्षेत्रात १०८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात सापडत आहेत. आज सर्वाधिक ठाणे मंडळातून १ हजार ३६२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
आतापर्यंत राज्यात ७८ लाख ९३ हजार १९७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १,४७,८६६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्यने वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करत असून कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर काही दिवसांमध्ये मास्क सक्ती होऊ शकते.