उत्तर महाराष्ट्रासह राज्यात पावसाचा यलो अलर्ट
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। मुंबईत मागील काही दिवसांपासून पाऊस तुफान बॅटींग करत आहे. सध्या मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण असून, जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, राज्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार कायम आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील तीन ते चार दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या अनेक भागांत सद्यस्थितीत पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तसेच अहमदनगर, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण असून, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत. जिल्ह्यातल्या 7 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. या पावसाने कापूस, मका ही पिके धोक्यात आली आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.