भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ओबीसी आरक्षण ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
सरसकट रद्द करा- चंद्रकांत पाटलांची मागणी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती दिल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आता राज्य निवडणूक आयोगानेही ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे गंभीर पेच निर्माण होणार असून आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच जागांवरील निवडणूक रद्द केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. ओबीसींच्या आरक्षित जागा वगळून अन्य जागांवरील निवडणूक घेता येईल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. पण न्यायालयाने ही निवडणूक घेतलीच पाहिजे असे काही म्हटलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या 27 टक्के जागा वगळून ऊर्वरित 73 टक्के जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊ नये. अशा निर्णयामुळे केवळ सामाजिकच नाही तर गंभीर राजकीय पेच निर्माण होत आहे. आयोगाने सर्वच निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

नगराध्यक्ष निवडीची वैधता काय?
एखाद्या नगरपंचायतीमधील एकूण 17 जागांपैकी ओबीसी आरक्षित पाच जागांची निवडणूक वगळून ऊर्वरित 12 जागांची निवडणूक घेतली तर त्या 12 नगरसेवकांकडूनच नगराध्यक्ष निवडला जाईल. अर्थात शहरातील पाच वॉर्डातील मतदारांना त्यामध्ये काहीच भूमिका असणार नाही. एकूण सदस्य संख्येच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी सदस्य उपलब्ध असल्यास अशा प्रकारे नगराध्यक्ष किंवा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रमुख निवडण्यास कितपत कायदेशीर वैधता राहील याबाबतही शंका आहे, असं त्यांनी सांगितलं.

निवडणुका कधी होतील याबाबत अनिश्चितता
ओबीसींच्या जागा वगळून निवडणूक घेतली तर ओबीसी आरक्षणाचा निर्णय होऊन त्या जागांवर कधी निवडणूक होणार याबद्दलही अनिश्चितता आहे. एकूण या बाबी ध्यानात घेता निवडणूक आयोगाने राज्यात सध्या चालू असलेली सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणीच त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!