भारतात ओमिक्रॉनची दहशत! मात्र कोरोनाविरोधी लसीकरणात नवा उच्चांक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूची दहशत पाहायला मिळतेय. १४ हून अधिक देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही आत्ता ओमिक्रॉन विषाणूने शिरकाव केला आहे, मात्र कोरोनाविरोधी लसीकरणात भारताने नवा उच्चांक गाठला आहे. देशातील ५० टक्के नागरिकांना कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस देण्याच आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.”भारतातील ५० टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे” आरोग्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १२७.६१ कोटी अँटी-कोविड लस देण्यात आल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, या वर्षी नोव्हेंबरमध्ये लसीचे सरासरी ५९.३२ लाख डोस प्रतिदिन दिले जात होते, तर मे महिन्यात सरासरी १९.६९ लाख डोस प्रतिदिन दिले जात होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतातील लोकसंख्येतील सुमारे८४.०८ टक्के प्रौढांना कोरोनाविरोधी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर ५० टक्के प्रौढांना दुसरा डोसही मिळाला आहे.
सध्या भारतात कोरोनाचे ९९,१२५ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामधून बरे होण्याचा दर सध्या ९८.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत ६९१८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्याच वेळी, आतापर्यंत देशभरात एकूण ३४०६०७७४ रुग्ण बरे झाले आहेत. यात देशातील दैनंदिन पॉझिटिव्ह रेट ०.७३ टक्के आहे, गेल्या ६२ दिवसांपासून हा रेट २ टक्क्यांपेक्षा कमी होतोय. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या ०.८० टक्के आहे; गेल्या २१ दिवसांपासून हा दर १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत देशात ६४.७२ कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
यात देशात शनिवारी एका दिवसात कोरोनाच्या एक कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे लसीचे १२७.५ कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूच्या चार नवे व्हेरियंट आढळून आले आहेत. दक्षिण आफ्रिकेत नव्या व्हेरिएंटनंतर देशात लसीकरणाचा वेग एका आठवड्यापेक्षा जास्त काळ वाढवण्यात आला आहे. मात्र या नव्या व्हेरिएंटला WHO ने ‘चिंताजनक’ म्हटले आहे.