दिवाळीच्या दिवशीच एसटी चालकाचे बसस्थानकातच विष प्राशन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। अधिकाऱ्याने बळजबरीने कर्तव्यावर पाठविले आणि वेतनवाढ होत नसल्याचा आरोप करत चालकाने बसस्थानकातच विष प्राशन केल्याची घटना गुरुवारी कडा येथे घडली. बाळू कदम असे विष प्राशन केलेल्या चालकाचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आष्टी आगाराची जामखेड – आष्टी ही जादा बस आष्टीहून पुण्याला पाठविली. आता जीव गेल्यावर तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार का? म्हणत आष्टी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
गुरूवारी (ता.४) दुपारी २ वाजता आष्टी आगाराचे, आगार प्रमुख संतोष डोके यांनी वाहनचालक बाळू कदम यांना कर्तव्यावर येण्यास सांगितले असता त्यास वाहनचालक कदम यांनी नकार दिला. परंतु बळजबरीने आगारप्रमुखांनी वाहन चालक बाळू कदम याला सांगितल्याने जामखेड-पुणे ही जादा बस (क्र.एमएच २० बीएल २०८६) घेऊन ते अडीच वाजेच्या दरम्यान पुण्याला निघाले. बस दुपारी तीन वाजता कडा बसस्थानकावर आल्यानंतर वाहन चालक बाळू कदम याने कडा बसस्थानकावर बस थांबविली व बसस्थानकाच्या बाहेर असलेल्या कृषी दुकानात गेले. फवारणीचे औषध खरेदी केले. मी आता औषध घेतो असे वाहकाला म्हणत, कडा-आष्टी रोडवरील नदीच्या कडेला हे विषारी औषध प्राशन करण्यासाठी गेले.
यावेळी वाहक साळवे व विभाग नियंत्रक आयशा शेख यांनी पळत जाऊन त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत त्यांनी विष प्राशन केले होते. त्यानंतर तात्काळ बाळू कदम यांना कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी आष्टी येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आगारप्रमुख डोके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
बाळू कदम यांना आष्टी येथील ग्रामिण रूग्णालयात दुपारी दाखल करण्यात आले. त्यांची तपासणी केली परंतु सदरील वाहन चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे आष्टी ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रामदास मोराळे यांनी सांगितले.
“माझ्या भावाने आज कर्तव्यावर जाणार नसल्याचे तीन दिवसापूर्वीचं आगार प्रमुखांना सांगितले होते. परंतु आगार प्रमुखांनी त्यालाच बोलावून खडे बोल सुनावत तुला नोकरी गमवावी लागेल. नीट काम कर म्हणत बळजबरीने कर्तव्यावर पाठविले. या घटनेला जबाबदार हे आष्टी आगाराचे आगार प्रमुखच आहेत.”
-संतोष कदम, विष प्राषन केलेल्या बस चालकाचा भाऊ