राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यातील १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यानचा हा दौरा असणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबई तसेच रत्नागिरी या दोन ठिकाणी वास्तूंचे उद्घाटन होणार आहेत. त्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी मुंबई आणि १२ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी असा त्यांचा नियोजित दौरा आहे. त्यानंतर १३ फेब्रुवारीला राष्ट्रपती हे तेलंगणा दौऱ्यावर असतील.
याआधी राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईतील राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथीवल दरबार हॉलचे उद्घाटन होणार होते. पण काही कारणास्तव हे उद्घाटन पुढे ढकलले गेले. ११ फेब्रुवारीला राजभवनात नव्याने उभारण्यात आलेल्या दरबार हॉलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती मुंबईत येणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाच्या मंत्र्यांचा शपथविधी हा दरबार हॉल येथे पार पडतो. त्याशिवाय अनेक शासकीय महत्वाच्या कार्यक्रमासाठी दरबार हॉलची एक वेगळी परंपरा आहे.
त्याशिवाय १२ फेब्रुवारीला राष्ट्रपतींचा दौरा हा रत्नागिरीच्या अंबावडे गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटनासाठी असणार आहे. या उद्घाटनानंतर राष्ट्रपतींचा पुढचा दौरा हा तेलंगणाचा असणार आहे. तेलंगणा येथे राष्ट्रपती १३ फेब्रुवारीला दौरा करणार आहेत. त्याठिकाणी संत रामानुज सहस्त्राब्दी समारोहासाठी राष्ट्रपतींची उपस्थिती असणार आहे. तसेच श्री रामानुजाचार्य यांच्या सोनेरी पुतळ्याचेही अनावरण करण्यात येणार आहे.
मुंबईत होणार दरबार हॉलचे उद्घाटन
राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता होणार आहे. कार्यक्रमाला श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच निवडक निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या दरबार हॉलचे उदघाटन निश्चित झाले होते. परंतु तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उदघाटन सोहळा त्यावेळी स्थगित करण्यात आला होता. काय आहेत नव्या दरबार हॉलची वैशिष्ट्ये ?
राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता २२५ इतकी होती. जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजभवनातील दरबार हॉल शपथविधी सोहळे, शासकीय कार्यक्रम, पोलीस पदकदान समारोह, शिष्टमंडळाच्या भेटी तसेच लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरला जायचा .
इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या १९११ साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता. त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तु रचनाकार जॉर्ज विटेट यांची होती. शंभर वर्षांहून अधिक काळ लाटा व वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे २०१६ नंतर त्याचा वापर थांबविण्यात व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला. नव्या दरबार हॉलचे बांधकाम २०१९ साली सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळे बांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले व डिसेंबर २०२१ मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा