महाराष्ट्र

राज्यातील ” या ” जिल्ह्यात पावसाचा इशारा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मागील काही दिवसांपासून कोरड्या हवामानाची नोंद झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. येत्या दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या (IMD) पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगाम वाया गेला असताना आता अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकेही धोक्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच सध्या उत्तर केरळपासून मराठवाडा आणि विदर्भापर्यंत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळात ईशान्यकडील वारे सक्रीय झाले आहेत. याचा एकंदरीत परिणाम म्हणून मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच याठिकाणी वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. येथील हवेचा वेग 20 ते 30 किमी प्रतितास इतका राहणार आहे.

दरम्यान याशिवाय मध्य आणि पूर्व भारतातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आगामी 5 दिवसांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पाऊस पडेल. तसेच झारखंड, ओडिशा आणि बिहारमध्ये देखील 20-21 फेब्रुवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच उत्तरेत नव्याने धडकलेल्या पश्चिमी डिस्टर्बन्सेसमुळे हिमालय परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. तर येत्या चोवीस तासात पंजाब, पश्चिम राजस्थान, चंदीगड आणि हरियाणा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!