वाझे प्रकरणाची केंद्राने चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल– राज ठाकरे
मुंबई : ‘एका पोलीस आयुक्तांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर असा आरोप केला आहे, गृहमंत्री दरमहिन्याला १०० कोटी आले पाहिजे, असे सांगतात. अशी घटना राज्याच्या नाहीतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असेल. जर दरमहिन्याला १०० कोटींची मागणी गेल्या वर्षापासून केली असेल तर आतापर्यंत १२०० कोटी मिळाले पाहिजे होते. तसेच राज्यात शहर किती त्यांचे आयुक्त किती? आतापर्यंत किती रक्कम मिळाली. या सर्व गोष्टींची चौकशी होण गरजेचे आहे. विशेष म्हणजे गृहमंत्र्यांवर करण्यात आलेल्या आरोपानंतर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे’,अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आली आहे. मात्र, जर परमबीर सिंह यांचा वाझे यांच्याशी संबंध असेल तर त्यांची बदली का केली. त्यांचा जर या प्रकरणात संबंध असेल म्हणून सिंह यांना निलंबित करण्यात आले, असे बोले जात असेल तर त्यांची चौकशी का केली नाही, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत सरकारने अद्याप उत्तर दिलेले नाही. याचा अर्थ आपल्या काही अंगाशी आलं का ते झटकून टाकने, असाच होतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले होते. मग, त्यांना उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकदा सेवेत आणले, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात. तसेच सचिन वाझे शिवसेनेतही होते आणि मुकेश अंबानी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी घनिष्ठ संबंधही आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला मुकेश अंबानी यांचा संपूर्ण परिवार देखील उपस्थित होता आणि त्यांच्याच घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि ती गाडी पोलिसांनी ठेवली, असा आरोप आहे, मुळात अशी घटना वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरुन करण्यात आला, याची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण त्याची चौकशी महाराष्ट्रात होणार नाही. तसेच योग्य प्रकारे केंद्राने सखोल चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावे बाहेर येतील, याची कोणी कल्पनाही करु शकणार नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.