महाराष्ट्रात पश्चिम बंगालप्रमाणे निर्बंध लागू होणार- विजय वडेट्टीवार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्यात लवकर पश्चिम बंगालप्रमाणे निर्बंध लागू करण्यात येतील अशी माहिती राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. शाळा, कॉलेज आणि ट्रेनवर निर्बंध लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. महाराष्ट्रात १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लवकरात लवकर या मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. तसेच यासाठी राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज केली असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्याचे मदत व पूर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी राज्यातील निर्बंधांविषयीची माहिती त्यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात रविवारपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या वर पोहचली होती. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी कोरोनाचा टार्गेट असणार आहेत. यामुळे १५- १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात तशा प्रकारे यंत्रणा सज्ज केली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
पश्चिम बंगालप्रमाणे निर्बंध लागणार
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. ज्या प्रमाणे पश्चिम बंगालच्या सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला आहे. तशाच प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातही निर्बंध लागू करतील. निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांचे लसीकरण करणं अत्यंत आवश्यक होते. या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यावर १५ वर्षांखालील मुलांचे लसीकरण करण्यात येईल. तसेच काही ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करुन त्यामध्ये लोकांना आतमध्ये जाता येणार नाही, गर्दी होणार नाही याची काळजी आणि दक्षता घेण्यात येईल. शाळा आणि रेल्वे हे निर्णय लॉकडाऊनमध्ये होत असतात. रेल्वेमध्ये गर्दी होत आहे. त्यावर मुख्यमंत्री गंभीर आहेत पण तो निर्णय कॅबिनटेमध्ये होईल. कॅबिनेटमध्ये चर्चा होईल परंतु निर्बंधांबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.