Russia-Ukraine War : १३७ जणांचा युद्धाच्या पहिल्या दिवशी मृत्यू,तर ३१६ जण जखमी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अधिक भडकलं आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात पहिल्या दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. जेलेंस्की यांनी एका व्हिडिओतून संबोधित करताना याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘आज आम्ही आमच्या १३७ हिरोसह नागरिकांना गमावले आहे. तर ३१६ जण जखमी झाले आहेत.’ तसेच या युद्धात कोणाची साथ न मिळल्याबाबतही जेलेंस्की म्हणाले. दरम्यान या युद्धामध्ये मध्यस्थी करण्याची मागणी युक्रेनने भारताकडे केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये बातचित केली. यावेळी रशियाला चर्चेतून वाद मिटवा हिंसेचा मार्ग सोडा, असे मोदी पुतीन यांना म्हणाले.
रशिया आणि युक्रेनच्या वादात इतर देश हस्तक्षेप करत नसून युक्रेन रशियासोबत एकटे लढत आहे. याबाबत युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की म्हणाले की, ‘रशियासोबत लढण्यासाठी युक्रेनला एकटे सोडले गेले आहे. आमच्यासोबत लढण्यासाठी कोण उभे आहे? मला काही दिसत नाही. युक्रेनला नाटो सदस्यत्वाची हमी देण्यासाठी कोण तयार आहे? प्रत्येक जण घाबरत आहे.’ राष्ट्रपती जेलेंस्की या व्हिडिओच्या माध्यमातून राजधानी कीवमधील राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सांगत होते. त्यावेळी ते म्हणाले की, ‘रशियाने राजधानी कीवमध्ये प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांना सतर्क राहा आणि कर्फ्यूचे पालन करा.’
दरम्यान रशियाने दावा केला आहे की, ‘हल्ल्यात पहिल्या दिवशी युक्रेनमधील ७० हून अधिक लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत.’ या हल्ल्यामुळे युक्रेनच्या लोकांना आपले घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भाग पाडले जात आहे. काल, गुरुवारी रशियाने युक्रेनवर संपूर्ण सैन्य दलासह हल्ला केला. ब्रिटन आणि अमेरिकासारखे अनेक देश या हल्ल्याचा निषेध करत आहेत आणि याचे गंभीर परिणाम होतील, अशा इशारा दिला आहे. पण असे असूनही याकडे दुर्लक्ष करून पुतीन म्हणाले की, ‘जर रशियाच्या कारवाईत कोणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर यापूर्वी कधीही न पाहिलेले परिणाम होतील.’ पुतीन यांनी थेट नाटो आणि अमेरिकेला इशारा दिला आहे.