Russia Ukraine War : युक्रेन-रशिया पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर ,दोन्ही देशात चर्चेची दुसरी फेरी सुरू,युद्धावर तोडगा निघणार?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। युक्रेन आणि रशिया दोन देशात गेल्या आठवडाभरापासून युद्ध सुरू आहे. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशात दोन दिवसांपूर्वीच चर्चेची पहिली फेरी पार पडली मात्र ती निष्फळ ठरली होती. आज या दोन्ही देशात चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. यातून तरी मार्ग निघणार का? युद्धावर तोडगा निघणार का? असे अनेक सवाल जगाच्या मनात आहेत. चर्चेनंतरच युद्धाबाबत स्पष्टता येईल. मात्र आज पुन्हा हे दोन्ही देश वाटाघाटीच्या टेबलावर आले आहेत. सकाळीच युक्रेनने (Ukraine) चर्चेला नकार दिल्याची बातमी आली होती. बेलारूसमध्ये (Belarus) या दोन्ही देशात चर्चेची पाहिली फेरी पार पडली आहे. त्यानंतर चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सध्याकाळपर्यंत या दोन्ही देशात चर्चा सुरू असल्याची बातमी आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
रशियाचा पाश्चमात्यांवर गंभीर आरोप
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी पाश्चात्य देशांवर अणुयुद्धाचा विचार असल्याचा आरोप केला. लॅव्हरोव्ह यांनी रशियन आणि परदेशी माध्यमांना दिलेल्या ऑनलाइन मुलाखतीत सांगितले की, हे स्पष्ट आहे की तिसरे महायुद्ध केवळ अण्वस्त्र युद्ध असू शकते. मी हे निदर्शनास आणू इच्छितो की अणुयुद्धाची कल्पना रशियन लोकांच्या डोक्यात नसून पाश्चात्य देशांच्या नेत्यांच्या मनात सतत आहे.