संजय राऊत-आशिष शेलरांमध्ये गुप्त भेट;प्रवीण दरेकरांनी वाढवलं भेटीचं गूढ,चर्चेला उधाण
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यातील गुप्त भेटीचा सिलसिला आता शिवसेना-भाजपपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांची आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना-भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार का ?या बाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात चार दिवसांपूर्वीच गुप्त बैठक झाली. त्यानंतर आज संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात आज मुंबईत गुप्त भेट झाली. अधिवेशनाच्या तोंडावरच या दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दोन नेते एकमेकांना भेटू शकतात, असं सांगून या भेटीचं गूढ वाढवलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत आणि आशिष शेलार याची नरिमन पॉईंटस येथील मेकर चेंबर्स येथे ही भेट झाली. त्यामुळे या भेटीवर तर्कवितर्क सुरू असतानाच प्रवीण दरेकर यांनी संदिग्ध प्रतिक्रिया व्यक्त करून चर्चेला हवा दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून काही भेटीगाठी सुरू आहेत. पण या भेटीत एक नेतृत्व कायम आहे. ते म्हणजे संजय राऊत. पण राऊत आणि शेलार यांनी भेटीचं खंडन केलं आहे. भेट झाली नसेल तर त्यावर तर्कवितर्क करणं चुकीचं आहे, असं सांगतानाच तुमच्याकडे फुटेज असले तरी दोन नेते एकमेकांना भेटू शकतात, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
आम्ही विरोधातच राहणार
भाजप कुणालाही ब्लॅकमेल करत नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. भाजप हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे, असंही दरेकर यांनी सांगितलं. तसेच शिवसेनेने हात पुढे केला तरी आम्ही विरोधातच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भेट झाली असती तर लपवण्याचं कारण नाही
काही स्पेसिफिक कारण असेल तर कोणीही नेता कुणाला भेटू शकतो. राऊत यांच्यासोबत माझी भेट झाली असती तर लपवण्याचं कारणच येत नाही, असं शेलार यांनी सांगितलं.
तासभर खलबतं
दरम्यान, मेकर्स चेंबर्स येथे संजय राऊत आणि आशिष शेलार भेटले. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली याचा तपशील गुलदस्त्यात आहे. दोन्ही नेत्यांनी अशा भेटीचा इन्कार केला आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या गाड्या मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना कॅमेऱ्यानं टिपल्या आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते काही तरी लपवत असल्याचं उघड होत आहे.