राज्यात दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार, आज आदेश निघणार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यात कोरोना निर्बंधात शिथिलता आणत राज्यातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुकानांच्या वेळेत बदल करावी अशी मागणी दुकानदार तसेच व्यापारी वर्गाकडून करण्यात येत होती. अनेकांनी सध्याच्या दुकांनांच्या वेळा वाढवत रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवावी अशी मागणी केली होती. दुकानांच्या वेळेबाबत करण्यात आलेल्या या मागणीचा विचार करुन राज्यातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार असून दुकानांच्या वेळेबाबत आज आदेश काढणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सांगली दौऱ्यावर असताना आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्या ठिकाणी शिथिलता करणे शक्य आहे त्या ठिकाणी शिथिलता करतो आहोत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
व्यापाऱ्यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा
राज्यातील कोरोना रुग्णांचा दर कमी झाला असून मृत्यूदरही आटोक्यात आल्याने राज्यातील दुकानांची वेळ वाढवून द्या अन्यथा आम्ही दुकाने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवू असा इशारा पुणे व्यापारी महासंघाने दिला होता. राज्य सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर ३ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनावेळी आम्हाला अटक करुन आमच्यावर कारवाई केली तरी त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली होती. मात्र आता राज्य सरकारने दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे