Maharastra Unlock : लवकरच महाराष्ट्र अनलॉक ?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। कोरोना महामारीच्या सुरुवातीला देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आढळत होते. मात्र आता देशातील इतर राज्यांपैकी महाराष्ट्रात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. महाराष्ट्रातील कोरोना आलेख हा उतरत्या दिशेला जात आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्र कधी अनलॉक होणार? सर्व निर्बंध कधी शिथिल होणार? असे निर्माण झाले आहेत. याच प्रश्नांची उत्तरं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. लवकरच महाराष्ट्रातील जाचक निर्बंध शिथिल होणार आहेत, असे संकेत राजेश टोपेंनी दिले आहेत. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘सध्या महाराष्ट्रात सहा हजारांच्या आसपास नवे कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाचा आलेख हा उतरताना दिसत आहे. त्याबद्दल आपल्याला निश्चित प्रकारे मनापासून समाधान आहे. त्यामुळे यापुढच्या काळात कोणत्याही जाचक गोष्टी राहणार नाहीत. ज्या आहेत, त्या हळूहळू कमी होतील,’ असे राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान राज्यात मंगळवारी दिवसभरात ६ हजार १०७ नवे कोरोनाबाधित आढळले होते आणि ५७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तसेच १६ हजार ३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. आतापर्यंत एकूण ७५ लाख ७३ हजार ६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८९ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ३३४ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत.