स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणुक आयोगाने घेतली सर्व पक्षीय बैठक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यातील 14 महानगरपालिका, 208 नगरपरिषदा, 14 नगरपंचायती, 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणुकांच्या पूर्वतयारीबाबत माहिती देण्यात आली.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर आणि उपायुक्त अविनाश सणस यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी विविध सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. राजकीय पक्ष नोंदणीपासून तर त्यांचे विविध अहवाल सादर करण्यापर्यंतची सर्व सुविधा लवकरच ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अद्ययावत माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळासह उमेदवारांसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा असेल. त्याचबरोबर उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी, मतदारांना उमेदवारांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी, तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी ट्रू व्होटर मोबाईल ॲपचीही सुविधा असेल, असे मदान यांनी यावेळी सांगितले.