मंदाताई खडसेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला : प्रकृतीच्या कारणांस्तव खडसेना दिलासा !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, प्रतिनिधी : पुण्यातील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात पीएमएलए विशेष कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळला असल्याचे वृत्त असून महाराष्ट्र टाईम ने याबाबत वृत्त दिले असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. त्याचवेळी एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणास्तव तूर्तास दिलासा देऊन कोर्टाने पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला ठेवली आहे.
एकनाथ खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या ते मुंबई रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे ते आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. खडसे यांना अजून काही दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे, असे सांगत त्यांच्या वकिलांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी आणखी वेळ मिळावा, अशी विनंती केली. त्यावर खडसे यांची ही विनंती न्यायालयाने मान्य केली व या प्रकरणात पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. एकनाथराव खडसे यांना या प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर ईडीने सुद्धा या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात खुद्द एकनाथराव खडसे, मंदाताई खडसे आणि गिरीश दयाराम चौधरी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. एकनाथराव खडसे यांची ईडीने आधी चौकशी केलेली असली तरी मंदाताई खडसे मात्र अद्यापपर्यंत इडीसमोर हजर झालेल्या नव्हत्या. त्यांनी आपण आजारी असल्याचे पहिल्यांदा कारण सांगितले होते तर दुसऱ्यांदा त्यांनी मुदत वाढवून मागितली होती.