महाराष्ट्रावर दहशतवादी हल्ल्याचं सावट,ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याचा धोका,सतर्कतेचा इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। प्रजासत्ताक दिन जेमतेम दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. विशेष म्हणजे यावेळी राज्यात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरं अलर्टवर आहेत. नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना तपास यंत्रणांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
डार्क नेटवरुन दहशतवाद्यांचे संभाषण
ड्रोन जितके उपयोगी आहेत, तितकेच ते धोकादायकही आहेत. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये संभाव्य ड्रोन हल्ल्यांबाबत केंद्रीय तपास यंत्रणा सतत सतर्कतेची सूचना देत असतात. तपास यंत्रणांना नुकतेच अशी माहिती मिळाली आहे की, डार्क नेटचा वापर करुन मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्या घडवण्याबद्दल दहशतवादी संभाषण करत आहेत.
महाराष्ट्राच्या सायबर विभागाने अहवाल दिला आहे, की दहशतवादी प्रवृत्तीच्या व्यक्ती ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर चर्चा करत होते. सरफेस इंटरनेटच्या तुलनेत डार्क नेट 99% आहे. टोर ब्राउझर हा डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज ट्रेस करता येत नाही. कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो. मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांबाबत अनेकदा अलर्ट दिले जातात.
ड्रोन हल्ला धोकादायक का आहे?
ड्रोन हल्ल्यात 20 किमी ते 30 किमी अंतरावरुनही निशाणा साधला जाऊ शकतो. ड्रोनवर पेलोड बसवता येतात. याशिवाय, त्यांना बॅकट्रॅक करणे सोपे नाही. गुन्हेगाराने मोबाईल फोन वापरला, तर त्याच्या आयएमईआय क्रमांकावरुन शोध लावला जाऊ शकतो, परंतु ड्रोन मागे टाकून गुन्हेगाराचा शोध लावता येत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवावी, अशी मागणी केली जाते.
महाट्रान्सकोवरील सायबर हल्ला
याआधी, 12 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबई आणि आजूबाजूला अचानक वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी तपासात हा सायबर हल्ला असल्याचं आढळून आलं होतं. महाट्रान्सकोच्या सर्व्हरवर 13 ट्रोजन हॉर्स असल्याचं तपासात समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार देशात प्रथमच सायबर सुरक्षा प्रकल्प आणत असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. अंदाजे 900 कोटी रुपये किमतीचा हा प्रकल्प असून नवी मुंबईतील महापे परिसरात तो उभारण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 1 लाख चौरस फुटांची जागा घेण्यात आली आहे.