डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव राज्यात वाढतोय ; आतापर्यंत ४५ रुग्णांना याची लागण, जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी दुसरी लाट कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यातील कोरोना निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. अशातच आता राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यातील डेल्टा प्लस व्हेरियंटचे ४५ रुग्ण आढळले आहेत. तसेच राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस आढळला आहे. या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक भाग म्हणून एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत काही नमुन्यांची जिनोम सिक्वेसिंग करण्यात येते. जनुकीय रचनेत बदल होणे हा व्हायरसच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग आहे. राज्यात आढळलेल्या ४५ डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांपैकी २७ रुग्ण पुरुष असून १८ महिला आहेत. जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आहेत. रत्नागिरीमधील एक मृत्यू वगळता उर्वरित रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचे स्वरुप सौम्य आणि मध्यम आहे. पुणे जिल्ह्यात डेल्टा प्लसचे तीन रुग्ण आढळले आहेत.
राज्यात काल, रविवारी ५ हजार ५०८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १५१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ४ हजार ८९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ५३ हजार ३२८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३३ हजार ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६१ लाख ४४ हजार ३८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत