शाळेची घंटा वाजणार ; ४ ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी,शहरी ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय लवकर घेण्यात आला नव्हता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याचे बघता कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. टास्क फोर्सकडून मिळालेल्या नव्या सूचनेनुसार, राज्यातील शाळा सुरू होणार आहे.
या निर्णयानंतर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी असे सांगितले की, ग्रामीण भागातील ५ ते १२ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. तर शाळेत उपस्थितीची सक्तीची राहणार नसून पालकांची संमती असणं आवश्यक असणार आहे. शाळा सुरु करण्याअगोदर आजारी मुलांना कसं शोधायचं? त्याच्या संदर्भात टास्क फोर्स ट्रेनिंग देणार आहे. यासोबतच पालकांनी काय काळजी घ्यायची या संदर्भातही आम्ही माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सने दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे.
४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल. तर ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, असेही वर्षा गायकवाड यांनी यावेळी म्हटले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आम्ही 4 ऑक्टोबरला शाळा सुरु करत असल्याची माहिती देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.