येत्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी पडणार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेली काही दिवस महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोरदार पाऊस कोसळला आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘जवाद’ चक्रीवादळाचा भारताच्या पूर्व किनारपट्टीला चांगलाच फटका बसला आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सरल्यानंतर देखील राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही. पण येत्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
सध्या हिमालयात पश्चिमी चक्रवात परिस्थिती निर्माण झाली आहे. थंडगार वारे हिमालयाकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत राज्यात थंडी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच 9 डिसेंबरपासून महाराष्ट्रासह देशात थंडीचा कडाका आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.