राज्यात मंदिरं उघडण्याची आणि मोठ्या कार्यक्रमांना परवानगी साठी वाट पहावी लागेल – टोपे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे आणि काही जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. पण येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी केली जात असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तसेच दोन डोस घेतलेल्यांना देखील १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास मिळण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘रेल्वे सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री व्यवस्थित अभ्यास करून निर्णय घेतील. आपण लोकल सुरू होण्यासंदर्भात २ ते ३ दिवसांची वाट पाहायला पाहिजे. तसेच मंदिरं उघडणे आणि लग्न समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत वाट पाहावी लागेल.’
दरम्यान तज्ज्ञांनी शाळा दिवाळीनंतर सुरू कराव्यात आणि मंदिर सुरू करण्याची राज्य सरकारने घाई करू नये असा सल्ला दिला आहे. याबाबत राजेश टोपे म्हणाले की, ‘कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजचा निर्णय संबंधित विभाग घेतली. मंदिरं उघडण्यासाठी आणि कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी थोडी वाट बघू. घाई गडबडीने काही गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे काही अनर्थ होऊ नये, संक्रमण खूप वाढू नये, या सगळ्या काळजी पोटी मुख्यमंत्र्यांनी काळजीपूर्वक गोष्टी सुचवल्या आहेत. त्यामुळे याबाबत थोडी वाट बघावी लागेल.’
टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन संदर्भात मिटींग होणार आहे. ऑक्सिजनसंदर्भात तिसऱ्या लाटेमध्ये अपेक्षित संख्या धरलेली आहे. इतके ऑक्सिजन पुरेस राहिलं की नाही यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण कसे राहू याकडे सध्या लक्ष्य आहे. दरम्यान आता आरोग्य विभागातील रिक्त जागा भरल्या जाईल.’