मीटर रीडिंग घ्यायला आले आणि दरोडा टाकून गेले !
मुंबई (वृत्तसंस्था)। कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष घरी येऊन मीटर रीडिंग करणं शक्य होत नसल्यामुळे वीज वितरण कंपन्यांनी सरासरी बिल लावायला सुरुवात केली. पण त्यामुळे लोकांना अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याच्या असंख्य तक्रारी या कंपन्यांकडे आणि सरकारकडे देखील दाखल झाल्या. अनेक लोकांनी प्रत्यक्ष मीटर रीडिंगला कर्मचारी पाठवण्याची मागणी देखील केली. पण मुंबईजवळच्या डोंबिवीमधल्या एका कुटुंबाला अशाच प्रकारची अपेक्षा महागात पडली आहे. विजेच्या मीटरचे रिडींग घेण्याच्या बहाण्याने दिवसाढवळ्या घरात घुसलेल्या दोन भामट्यांनी घरातील दागदागिने पैसा अडका चोरी करून पोबारा केला. ही घटना बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील चोळेगाव येथे घडली. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्व येथील चोळेगाव येथील चाळीत राहणारे प्रकाश काजरोळकर हे सकाळी बाजारात भाजी आणण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांच्या पत्नी प्रमिला आणि नातू दोघेच घरात होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांच्या घरी आले व आम्ही MSEB मधून मीटर रीडिंग घेण्यासाठी आलो असल्याचे सांगून घरात प्रवेश मिळवला.
काही वेळाने हे दोघे निघून गेल्यावर प्रमिला यांचे पती प्रकाश हे बाजारातून घरी आले असता त्यांना घरातील कपाट उघडे दिसले. कपाटातील दागिने आणि रोकड असा एकूण एक लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. प्रकाश यांनी पत्नीकडे चौकशी केली असता दोघे जण मीटर रीडिंग घेण्यासाठी आले होते अशी माहिती पत्नीने दिल्यानंतर त्या दोघांनी चोरी केली असल्याचा संशय येताच प्रकाश काजरोळकर यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.