आगामी निवडणुका कॉग्रेस स्वबळावर ; इच्छुकांची पटोलेंनी मागवली यादी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने काढलेल्या एका पत्रामुळे निवडणूक स्वबळावरच लढण्याचं काँग्रेसने ठरवले असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. राज्यभरातून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या नावाची यादी मागवण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी काँग्रेसनं जोरदार तयारी सुरु केली आहे. सत्तेत आल्यापासूनच काँग्रेसकडून स्वबळावर लढण्याबाबतची घोषणा करण्यात येत होती. आता एक परिपत्रक जारी करुन काँग्रेसनं निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून काढण्यात आलेल्या पत्रात राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांची यादी मागविण्यात आली आहे. जिल्हास्तरीय बैठकाचा आढावा पटोले घेत आहेत. राज्यातील सर्व शहर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटींना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी 8 जानेवारीला एक पत्र पाठवले आहे. या पत्रात महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचा उल्लेख केला आहे. म्हणून आपल्या जिल्ह्यातील इच्छुकांच्या नावांची यादी प्रदेश कार्यालयाला पाठवण्याची सूचना या पत्रात करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर कॉंग्रेस आगामी निवडणुकीसाठी सतर्क झाली आहे. कधी नव्हे ते पूर्वतयारीसाठी नेते कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. नाना पटोले यांनी दोन दिवसापूर्वी मुंबईत शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ही निवडणूक स्वबळावर लढण्यासोबतच इतरही निर्णय या बैठकीत घेण्यात आले. वेळेवर शोधाशोध करण्यापेक्षा काँग्रेसने आत्तापासून महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार शोधून ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर सामाजिक आणि राजकीय समीकरणे बघून उमेदवारी जाहीर करण्यात येईल. महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीप्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक घेतली.