सावधान:पुढील २ महिने राज्यासाठी धोकादायक, कोविड टास्क फोर्सचा इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट थोड्या प्रमाणात आटोक्यात आली आहे. मात्र जगभरातील आणि देशातील तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यातील कोविड टास्क फोर्सने राज्याला पुढील दोन महिने धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत तर काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे रुग्णांची नोंद मंदावली आहे. मात्र कोरोना संपलेला नसून यामुळे कोरोना मुक्ती पाहिजे असेल तर मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यास प्रयत्न केला पाहिजे. असे कोविड टास्क फोर्सने म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवली असून कोरोना रुग्णांची नोंद कमी होत आहे. परंतू कोरोना अजून संपलेला नाही हे सामान्य नागरिकांनी लक्षात घ्यायला पाहिजे असल्याचे कोविड टास्क फोर्सचे डॉ.शशांक जोशी यांनी सांगितले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने राज्याला पुढील २ महिने धोकादायक आहेत. या दोन महिन्यांत अनेक सण-उत्सव येत आहेत. यामुळे पुढील २ महिन्यांत कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्याचे परिणाम दिसणार आहेत. मागील वेळी नागरिकांच्या चुकीमुळे कोरोना पुन्हा फोफावल्याचे निदर्शनास आलं आहे. यामुळे पुढील २ महिने अधिक सतर्कता बाळगली पाहिजे असल्याचे कोविड टास्क फोर्सने म्हटलं आहे.
नियमांचं पालन बंधनकारक
राज्यात काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. यामुळे नागरिक बाहेर पडत आहेत. पावसाचे दिवस असल्यामुळे पर्यटनासाठी गर्दी होत आहे. अशामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाणा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोना चाचणीच्या प्रमाणात वाढ केली पाहिजे. तसेच नागरिकांना मास्कचा वापर, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचे आहे. नागरिक कोरोना नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करत असतात यामुळे असे नागरिक स्वतःसह इतरांनाही धोका निर्माण करत असल्याचे कोविड टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
१५ दिवस धोक्याचे – केंद्र सरकार
देशात ऑगस्ट महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. यामुळे १९ ऑगस्टपासून ते १५ ऑक्टोबर या कालावधीतील १५ दिवस अधिक घोक्याचे असल्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दिवसांत केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारला कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे दिवस सणाचे असल्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत.