महाविकास आघाडीत नेमकं चाललंय तरी काय? आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी राऊताच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण..!
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीनंतर लगेचच संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक इथे दाखल झाले. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोनवेळा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा इथे या दोघांची भेट झाली. जवळपास दीड तास संजय राऊत हे वर्षा बंगल्यावर होते.
वर्षा बंगल्यावरुन संजय राऊत थेट सिल्व्हर ओकवर दाखल झाले. इथे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसोबत दीड तास चर्चा केली. मात्र शरद पवारांसोबत केवळ 15 ते 20 मिनिटांचीच चर्चा झाली. पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत काय म्हणाले?
या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांना सहज भेटलो, काहीही घडामोडी नाहीत, मुख्यमंत्र्यांचा काही निरोप असेल तर तुम्हाला (मीडियाला) कशाला सांगू, पवार साहेबांना सांगेन, हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल, उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत असं शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात या सरकारचं काम चालेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवरुन बाहेर आल्यानंतर दिली. मुख्यमंत्री-संजय राऊत दुसऱ्यांदा भेट
दरम्यान, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोनवेळा भेट घेतली. संजय राऊत आज वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर तिथूनच संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर रवाना झाले.
संजय राऊत हे दोन दिवसात सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटत आहेत. तीन दिवसापूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं झाली. या चर्चेनंतर लगेचच संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय, याचे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.