15 जुलै नंतर राज्यातील निर्बंध शिथिल होणार?
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहाता टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस यांचा राज्यातील निर्बंधाला विरोध आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अप्रत्यक्ष बोलूनही दाखवलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळात राज्यातील निर्बंध शिथील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात वाढणाऱ्या डेल्टा प्लस या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटपासून सावधान होत निर्बंध कठोर करण्यात आले होते. दोन आठवड्यातील परिस्थिती पाहाता राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्या आणि मृताची आकडेवारीही घटताना दिसत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय होऊ शकतो.पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते. निर्बंध कशा पद्धतीने शिथिल करण्यात यावेत, याचा एक सविस्तर अहवालच टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला असून यावर सखोल चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने हे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. हे निर्बंध शिथिल करण्यासाठी ‘ओपनिंग अप’ या संकल्पनेचा वापर केला जाणार असून पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या जाणार असल्याच समजते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकतो.
कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटमुळे राज्य सरकारने 23 जिल्हे तिसऱ्या टप्प्यात गणले. सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत दुकानांना परवानगी दिली असून शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश निघाले. या आदेशाने पुन्हा लहान-मोठ्या व्यावसायिकांसमोरील अडचणी वाढल्या तर राज्याची आर्थिक स्थितीसुद्धा बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता 15 जुलैनंतर राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून निर्बंध शिथिलतेचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापना कडून देण्यात आली.