राज्यातले निर्बंध पुन्हा वाढणार? राजेश टोपे यांनी स्पष्ट केली शासनाची भूमिका
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यातल्या करोना रुग्णसंख्येचा आलेख आता उतरता दिसून येत आहे. मुंबई, पुणे, रायगड सारख्या रुग्णसंख्येचा उच्चांक गाठलेल्या भागातली रुग्णसंख्याही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पण मग राज्यातल्या निर्बंधांचं काय? या प्रश्नाकडेच सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. याबद्दलच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक वक्तव्य केलं आहे. राज्यातल्या निर्बंधांबद्दल त्यांनी आता शासनाची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. आता करोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबई-पुण्यातही संख्या कमी होत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल. आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
यावेळी ते म्हणाले, “आमच्या हे लक्षात आलं आहे की करोना रुग्णसंख्या उतरती आहे.४८ हजारांवर गेलेली संख्या आता १०-१५ हजारावर आलीये. जिथे उच्चांक होता तिथेही रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे आपण मार्चमध्ये एन्डेमिकपर्यंत जाऊ, असं मला वाटतं. काही ठिकाणी वाढ होतेय, तिथे उच्चांक गाठला जाईल. पण त्यानंतर रुग्णसंख्या पुन्हा कमी होईल असा अंदाज येतोय. त्यामुळे शासनाचा कल निर्बंध वाढवण्याकडे नसून कमी करण्याकडे आहे. सगळ्या निर्बंधांबाबत बैठकीत चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यामुळे निर्बंध हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येतील.