योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेत वाढ सलग तिसऱ्यांदा सर्वोत्तम मुख्यमंत्री !
मुंबई (वृत्तसंस्था)। देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत.
” इंडिया टूडे ” आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘मूड ऑफ द नेशन’ नावानं १५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील ग्रामीण व शहरी भागांतील लोकांची मतं जाणून घेण्यात आली. त्यांना आपापल्या राज्यातील सरकारबद्दल प्रश्न विचारण्यात आले. पहिल्या क्रमांकावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता यावेळी आणखी वाढली आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षात १८ टक्के लोकांनी योगींच्या कामाचं कौतुक केलं होतं. आता २४ टक्के लोकांनी त्यांचं काम चांगलं असल्याचं म्हटलं आहे. अपहरण व खुनांच्या प्रकरणांवरून योगी सरकारवर टीका होत असतानाही त्यांची लोकप्रियता टिकून आहे. सलग तिसऱ्यांदा त्यांनी हे यश मिळवलं आहे.
टॉप फाइव्ह मुख्यमंत्री-
- योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश) – २४ टक्के
- अरविंद केजरीवाल (दिल्ली) – १५ टक्के
- जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश ) – ११ टक्के
- ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) – ९ टक्के
- उद्धव ठाकरे व नितीश कुमार – ७ टक्के